महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ सन 2017 पासुन भव्य किसान आधार संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या किसान आधार संमेलनात शेतकर्यांसाठी कृषि प्रदर्शन, विविध पिकांचे प्रात्यक्षिके, पशु प्रदर्शन आणि विविध कृषि विषयांवर व्याख्याणे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत असते. या किसान आधार संमेलनातील पीक प्रात्यक्षिकांमध्ये तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, भाजीपाला, चारा आणि नगदी पिकांमधील विविध वाणांचे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. या प्रात्यक्षिकांमध्ये ड्रॅगन फळ लागवड, शेडनेटमधील फुल शेती व भाजीपाला लागवड याचा समावेश केलेला आहे. याचबरोबर सिंचन प्रणाली, निचरा पध्दती, माती परिक्षण प्रात्यक्षिके, एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल, गांडूळ खत उत्पादन प्रकल्प, मधुमक्षिका पालन, जिवाणू खते, जैविक किड नियंत्रण, एकात्मिक किड व्यवस्थापन इत्यादी कृषि तंत्रज्ञान पाहण्याची व जाणून घेण्याची संधी या निमित्त उपलब्ध करुण देण्यात येते. किसान आधार संमेलनामध्ये भव्य असे कृषि पदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या कृषि पदर्शनामध्ये शेतकर्यांना शासकीय संस्था तसेच खाजगी कंपन्या, कृषि निविष्ठा, कृषि अवजारे, प्रक्रिया उद्योग, कृषि पूरक व्यवसाय, आळिंबी उत्पादन, सुंगधी व औषधी वनस्पती अशा आधुनिक कृषि तंत्रज्ञान दालने उभारण्यात येतात. या व्यतिरीक्त भव्य असे पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येते. प्रदर्शनस्थळी कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेले तंत्रज्ञान, कृषि विभागाच्या योजना, विविध खाजगी कंपंन्यांनी विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकर्यांना एकाच दालनाखाली पाहण्यास मिळतात. या प्रसंगी प्रत्येक दिवशी विविध विषयांवर कृषि शास्त्रज्ञांचे आणि प्रगतशील शेतकर्यांचे व्याख्याणे आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातुन विद्यापीठ विविध लोकाभीमुख उपक्रम राबविण्यावर भर देत आहे.